आणि सहा मिनटांचा प्रवास तीस मिनटांचा झाला……

आज भोर – आळेफाटा प्रवासात स्वारगेटवरून शिवाजीमहाराज नगरला जाण्यासाठी PMPML या पुणे महानगर पालिकेच्या गाडीत चढलो. चढतानाच कंडक्टर ने धमकी वजा सूचना केली बस गॅस भरण्यासाठी थांबणार आहे. अजून कुठली गाडी शिवाजीमहाराज नगरला जाते हे माहीत नसल्याने त्याच गाडीने जण्याचा निर्णय घेतला. म्हटल पाच-दहा मिनीटांनी काय होणार आहे? जाऊयात. गाडी निघाली. फारशी गर्दी नसल्याने बसायला जागा मिळाली. टिकिट  घेताना ‘शिवाजीमहाराज नगर एसटी स्टँड आल की सांगा’ असं सांगून पुण्याचे सौंदर्य न्याहाळण्यात गुंग झालो. एक-दोन रस्त्यावरच्या पाट्या बघून मला पुणेकरांचे किस्से आठवले आणि सोबतच कंडक्टरचे बोलणे देखील……काळजी म्हणून मोबाइल काढून गूगलचा नकाशा उघडला. शिवाजी महाराज नगर शोधून नकाशा सुरू केला. 

थोड्या वेळाने नकाशावर अपेक्षित थांबा सात मिनटांच्या अंतरावर दाखवू लागला. विचार आला निगडीला जाणारी बस आहे, बहुतेक शिवाजी महाराज नगर गेला की मग बस  गॅस भरणार असेल  म्हणून मी सामान घ्यायला सरसावलो आणि ड्रायवरने  गाडी पंपावर वळवली……’अरे यार’ अशी आपसूक प्रतिक्रिया उमटली आणि मी सीटवर बसणार इतक्यात बस खाली कोणी आल्यासारखे ड्रायवर किंचाळला ‘गॅस भरायचाय, उतारा खाली’ ‘आय…..उतार की खाली’ वगैरे वगैरे……

खाली उतरून नकाशा बघितला तर सहा मिंनटांवर थांबा दाखवत होते. चालत १५ मिनिटे विचार केला कशाला उगाच पायपिट? पाच मिनिटात बस येईल दहा मिनिटात स्टॉपला उतरू.

बरोबर पाचच मिनिटात गाडी आली. सगळे बसले, मोबाइल हातातच होता. गाडी निघाली नकाशा ज्या दिशेला जायला सांगत होता बरोबर त्याच्या उलट्या बाजूला गाडी निघाली. मी धास्तावलो गॅस भरून गाडी परत माघारी तर नाही ना जाणार?? म्हणून पळत कंडक्टरला विचारले ‘काका, नक्की गाडी शिवाजी महाराज नगरला जाणार ना?’ पैसे जुळवण्यात गुंग कंडक्टरने  फक्त होकारार्थी मान डोलावली. उत्सुकता म्हणून मोबाइल मध्ये नकाशा बघायला सुरुवात केली की गाडी नक्की कुठल्या मार्गे जातेय? जिथून नकाशा ने ६ मिनिटे रस्ता दाखवला होता तिथून गाडी उलट्या बाजूला जाऊन, शिवाजी महाराज नगर रेल्वे स्थानकाला वळसा घालून, एका चौपदरी रस्त्याने पुढची वीस मिनिटे अधिकाचा रस्ता करत शिवाजी महाराज नगर बस स्थानका जवळ येऊन थांबली आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात मोबाइल वरील नकाशातली बाई तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानी पोचल्याचे सांगत होती. 

लेखक 

अमर पडवळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top