पोपटाने काढलेल्या चिट्ठीतील भविष्य असेल किंवा आत्ता सोशल मीडिया वर एखादया युटूबरने टाकलेला ‘या राशीवर या ग्रहाचा प्रकोप किंवा दया’ वगैरे वगैरे. वाचून एक प्रश्न नक्कीच पडतो. एकच भविष्य अनेक लोकांचं कसं असू शकतं?? १०-१२ चिठ्ठयांमध्ये आख्या जगाच भविष्य असू शकतं? अंबानींच्या राशीमध्ये शनीचा प्रकोप झाला नसेल? त्याला साडेसाती लागली नसेल??
मुळात हे भविष्य वगैरे खरंच सत्य असतं का?? मग अनेकदा इंटरनेट वर जागतिक कुठल्यातरी बाबाने कोरोना बाबत केलेले भविष्य वाचण्यात येते, पंचाग सांगणाऱ्याची मुलाखत टीव्ही वर बघितल्यावर अजून संभ्रम वाढतो.
अजून संभ्रम वाढवणारी एक घटना सांगावीशी वाटते. आपल्या सूर्यमालेतील सगळे ग्रह सूर्याभोवती फिरत असतात आणि सतत आपली जागा बदलत असतात. कुठलीही घटना घडते तेंव्हा सूर्यमलेचा काय पॅटर्न होता, कुठला ग्रह कुठे होता या वरून भाकिते केली जातात. काही दिवसांपूर्वी रामसेतू या चित्रपटात राम जन्मा बाबत पुरावा देताना रामायणात राम जन्मावेळी ग्रहांच्या स्थितीचे वर्णन केले आहे आणि ते वर्णन नासा सारख्या जगविख्यात अंतराळ संशोधन संस्थेने पडताळून पाहिले आणि ते खरे होते. मग याचा अर्थ असा होतो का? की भारतीय पूर्वी पासून ग्रहांच्या स्थिती वरून भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा संदर्भ घेऊन भविष्य सांगत असतील किंवा त्यांना ते कळत असेल. म्हणजे रामाच्या जन्मावेळी जन्मलेल्या मुलांचं भविष्य रामासारखा असेल. म्हणजे अगदीच तो वनवासाला नाही जाणार पण परिवारापासून दूर जाईन वगैरे वगैरे….
भविष्य खरं की खोटं हा मुद्दा आपण बाजूला ठेवला तर मला वाटतं कळत असून ही कोणी खर भविष्य सांगू शकतं नाही. कारण जगात प्रत्येकालाच आपल्या विषयी चांगलाच एकायला आवडत. समजा जर एखाद्या व्यक्तीला खरंच भविष्य कळत असेल आणि त्याने सांगितलं तुमचा मुलगा नापास होणार आहे किंवा तुमचा जॉब जाणार आहे. तर समोरचा व्यक्ती कितपत हे स्वीकारेन?
दारू पिऊ नये, शरीरासाठी हानिकारक असते. हे त्रिकाल सत्य जवळपास प्रत्येकालाच माहीत असत. तरीही दारूमुळे कितीतरी लोक रोज हॉस्पिटल मध्ये भरती होतात. तुम्ही कधी भविष्य बघितलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यात या ग्रहाचा दोष असल्याने तुमचं नुकसान होणार आहे, त्या ग्रहाची शांती केली तर तुमचं नुकसान टळेल असं सांगून त्याचा व्यापार केला जातो. कुठलाही ग्रह एका दुसऱ्या ग्रहावरील एका प्राण्याच्या जीवनात का हस्तक्षेप करेन?? भविष्य जाणून घेण्याच्या नादात आपण भोंदू गिरीला अंधश्रध्देला बढावा देत असतो.
समजा आपल्याला आपल भविष्य अचूक माहीत आहे. जसा चित्रपटाच्या हिरोला माहीत असत. तरी आपण काय करू शकणार आहोत? फार फार तर आपल्या मनाची तयारी? त्या व्यतिरिक्त काहीच नाही. महाभारता मध्ये श्रीकृष्णाला सगळ्यांचं भविष्य माहीत होतच की, तो श्रीकृष्ण आपल्या लोकांचे सोडाच पण स्वतःचे प्राण नाही वाचवू शकला तर तुम्ही आम्ही कोण आहोत?? काळापुढे स्वतः देवाने हात टेकले त्या काळापुढे मानव जरी गेला तरी काय करू शकणार आहे??
थोडक्यात काय तर आपण आपलं भविष्य बघण्याच्या अट्टाहासात चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी तर घालत नाही ना याची खात्री करावी.
अमर पडवळ